एक महिन्यापुर्वी पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर इतर मुले जशी स्पर्धा
परिक्षेच्या अभ्यासासाठी शहराची वाट धरतात...तसं मीही आपलं नशीब
आजमावण्यासाठी शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात मोठ्या उत्साहाने
दाखल झालो होतो...गावापासून पुणे हे अंतर 300-350 किलोमीटरचं असल्याने
दिवसाच्या प्रवासाचा त्रास नको म्हणून रात्रीच्याच प्रवासाने निघालो...निघण्याआधी पुण्यातल्या मित्राला फोन करुन सांगितलं होतं की पहाटे पाच वाजेपर्यंत मी तिथे पोहोचेन अन् तु मला घ्यायला ये...तो 'हो' म्हणाला
होता तरीसुद्धा रात्रभर मी त्याला पहाटे लवकर ये...झोपू नको म्हणून फोन,एसएमएस करुन आठवन करुन देत होतो कारण मला भिती वाटत होती की हा पहाटे-पहाटे गाढ झोपी गेला तर काय घ्या...आणि शेवटी तसंच घडलं...मी माझा स्टाॅप आल्यानंतर जड बॅगा घेऊन खाली उतरलो तर तो अजून आलेलाच नव्हता...रात्रभर मोबाईलवर गाणी, इंटरनेटमुळे बॅटरी संपली होती...आणि तिकडे तो रात्रभर मी त्याला फोन करुन त्रास दिला असल्यामूळे पहाटे-पहाटेच झोपी गेला होता...माझी चांगलीच पंचाईत झाली...तासाभरानी तो मी जिथे थांबलो होतो तिथे आला आणि मी एकदाचा सुटकेचा निःश्वास सोडला...
तो दिवस प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी मित्राच्या ताईच्या
घरीच घालवला. दुसर्या दिवशी आम्हा दोघांना राहण्यासाठी खोली शोधायची
होती कारण त्या ताईंची फॅमिली असल्यामुळे तिथं राहणं शक्य नव्हतं शिवाय
फॅमिली म्हटलं की प्रायव्हसीचा प्रश्न आणि घरच्या गलबलाटात अभ्यास करणं
शक्य नव्हते म्हणून आम्ही दोघे सकाळीच रुमच्या शोधात घराबाहेर पडलो...दोन
दिवस इकडे-तिकडे उन्हात फिरून शेवटी हडपसर येथे मनासारखी रूम भेटली अन्
आम्ही अभ्यासाला लागलो...
आत्तापर्यंतचं शिक्षण खेडेगावात झालं असल्यामुळे आणि पुण्यासारख्या शहरात प्रथमच आलो असल्यामुळे हा शहरी झगमगाट आपल्याला मानवेल का...?
इथली प्रचंड स्पर्धा, धावती गर्दी या सर्वांमध्ये आपला निभाव लागेल का..? या प्रश्नांनी मनात सतत हुरहूर वाटायची. गावाकडे काही अशी मुले असतात ना की जे पुणं फिरुन-फिरुन पालथं घालून आलेली असतात, त्यातल्याच एकानं मला येतेवेळी सल्ला दिला होता की तु जोपर्यंत पुणं पायी फिरत नाहीस तोपर्यंत
पुण्यातलं तुला काहीच कळणार नाही. खरंच होतं ते...! पहिले काही दिवस आम्ही अॅटो किंवा पीएमटीने प्रवास करत असायचो. माझा मित्र इथे थोडाफार
रुळला असल्यामुळे त्याला काही गोष्टींची माहीती होती पण मला दरवेळेस
रस्ते लक्षात ठेवण्यासाठी दुकानांच्या पाट्या वगैरे सारख्या खाणाखुणा
लक्षात ठेवाव्या लागत असत. मग मला त्या मित्राने दिलेला सल्ला आठवला आणि
अभ्यासिकेला पायीच यायचं-जायचं ठरवलं. इथल्या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी
नविन होत्या, सगळ्याच गोष्टींचं मला कुतूहल वाटायचं...प्रत्यक्षात जुळवून
घेताना त्रास होत होता. खाण्या-पिण्याची तारांबळ उडत होती...पायी चालताना
गावाकडचे एक-एक प्रसंग आठवायचे...काॅलेजला मित्रांसोबत पायीच जात असताना
कसा धिंगाणा घालायचो...अशा एक ना अनेक आठवणी डोळ्यांसमोर तरळायच्या अन्
मन भरून यायचं...कितीही मोठा झालो असलो तरी आईची आठवण ही येतच होती. घरात
पाऊल पडताच आई दिसली नाही की आई कुठे आहे ? आई कुठे आहे ? म्हणत घर
डोक्यावर घ्यायचं आणि एकदाची आई दिसली की कावरंबावरं मन शांत व्हायचं अन्
मुकाट्याने आपली कामे करायचो...हे सगळं बघून घरातली इतरजण माझी टिंगल
उडवायचे...इतका मोठा झाला आहेस अजूनसुद्धा लहान मुलांसारखं आई-आई काय
करतोस म्हणून माझी चेष्टा उडवायचे...ते सर्वच इथे आठवत होतं...अशावेळी...
"आई म्हणोनी कोणी | आईस हाक मारी | |
ती हाक येई कानी | मज होय शोककारी | |
अशी माझी अवस्था होई.
दिवसामागून दिवस जात होते. एक-एक दिवस वर्षासारखा होता
माझ्यासाठी...! पहिल्या दिवशी बसमधून जड बॅगा घेऊन उतरल्यानंतर तोंड
धुवून प्यायलेला चहा...मित्राची वाट बघत ताटकळत थांबलेलो मी...माझ्याजवळच्या मोठ्या बॅगामुळे वळून-वळून बघणारी रस्त्यावरची
माणसं...एका वेगळ्याच ओढीने एकामागून एक धावणारी आणि त्यातच पुढे जाऊ
पाहणारी माणसं... पीएमटीने प्रवास करताना 'महिलांसाठी राखीव' असलेल्या
जागेवर बसलेल्या पुरुषांसोबतची महिलांची भांडणं...गर्दीमुळे बसचं तिकीट
काढणं शक्य झाले नसलेल्या व्यक्तीची तिकीट तपासणीस आल्यानंतर उडालेली
तारांबळ...इथल्या जेवण-पाण्यानं आजारी पडणं...आणि अशा सगळ्यात पुणेकरांनी
हेडफोनची बनवलेली फॅशन आणि तो कानात असतानाच सावरकरांनी लिहिलेलं, लता
मंगेशकरांनी गायिलेलं 'ने मजसी ने परत मातृभूमीला...' हे गाणं...हे सगळे
प्रसंग आठवले की वाटायचं 'गड्या आपला गाव बरा...'
-महेश कुंभार, उमरगा
रविवार, १९ जुलै, २०१५
जुळवून घेताना...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)