दिल्लीत एअर-फोर्समध्ये कर्तव्यावर असलेला माझा मित्र शरद, त्याला सवड मिळेल तसा अधून-मधून फोन करत असतो. फोनवर बोलता-बोलता, सध्या विचित्र पद्धतीने होत असलेल्या मानवी हत्याकांडाच्या घटनांचा संदर्भ आला. त्याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या गप्पांबद्दल सांगितले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने, मागच्या कांही दिवसांपासून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विचित्र घटना आणि त्या घटनांच्या केंद्रस्थानी असलेला माणूस इतका क्रुर, असंवेदनशील आणि विकृत कसा बनत चालला आहे, याची काही कारणे सांगितली.
आजच्या आधुनिक पिढीकडे मुळातच मैदानी खेळांमधून विकसित होणाऱ्या कौशल्यांचा अभाव दिसून येतो, असे त्या अधिकाऱ्याचे म्हणणे होते...जसे की संघभावना, यशासाठीचा संघर्ष, संयम, अपयश पचवण्याचे धैर्य, खिलाडूवृत्ती, मानसिक कणखरपणा इत्यादी. मैदानी खेळातून मिळणारी कौशल्ये आयुष्यातील संघर्षाचा सामना करण्यासाठी मदत करतात. काही खेळ शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक क्षमतेचीही परीक्षा घेणारे असतात. दुर्दैवाने आजची तरुण पिढी मैदानी खेळांपेक्षा मोबाईलवरच्या 'गेम्स'मध्ये गुंतून पडली आहे...
आजच्या सुजाण पालकांनी आणि मुला-मुलींनी 'जंगली रम्मी' सारख्या आभासी खेळांपेक्षा शरीर थकवणाऱ्या मैदानी खेळांवर भर दिला पाहिजे...मोबाईलवरच्या खेळात हरल्यावर तो खेळ पुन्हा खेळून-जिंकून तात्पुरता आनंद मिळविता येतो परंतु आयुष्याच्या खेळात हरल्यानंतर अशी संधी पुन्हा मिळत नाही. प्रत्यक्ष संघर्ष करुन मिळविलेल्या विजयाचा आनंद काही औरच असतो...
आज आपण स्मार्ट बनण्याच्या नादात 'स्मार्टफोन'च्या इतक्या आहारी गेलो आहोत की, त्याच्याशिवाय आपलं पानही हलत नाही...स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आपण आपली वाटचाल विनाशाच्या दिशेने घेऊन जात आहोत, हे कळायला आकाशवाणी होण्याची गरज नाही...!
प्रत्येक गोष्ट झटपट आणि मनासारखी घडून यावी असा आपला नेहमीच अट्टाहास असतो. 30 सेकंदाच्या वर तर आपण काही पहातच नाही... 'स्क्रोल-डाऊन' आणि 'स्वाईप-अप' संस्कृतीने आमच्या संयमाची केंव्हाचीच ऐशीतैशी करुन ठेवलीय...
प्रत्यक्ष भेट झाल्यावर आपल्याला बोलायला वेळ नसतो, मात्र मोबाईलवर तासनतास गप्पा मारणे आणि बोगस रिल्स पाहणे, यासाठी वेळच वेळ असतो...फोनवर बोलण्याची तर आम्हाला इतकी सवय झालीय की, परवा माझा एक मित्र घाई-घाईने भेटून जाताना 'येऊ का' म्हणण्याऐवजी 'ठेवू का' म्हणाला. माझी 'हसावं की रडावं', अशी स्थिती झाली...
वेळीच सावध होऊन आपण सर्वांनी मोबाईलच्या अतिवापरावर स्वतःहून बंधने घालायला हवीत. अन्यथा आज घडत असलेल्या घटनांपेक्षा भयंकर घटना घडल्या तर आश्चर्य वाटायला नको...!
- महेश कुंभार