सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

लोकशाही की दडपशाही




संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावती' सिनेमामुळे राजस्थानातून होणारा जो विरोध आहे तो अनाठायी स्वरुपाचाच आहे...ऐतिहासिक सिनेमे बनवताना दिग्दर्शकाने इतिहासाची तोडमोड केली हा वाद नेहमीचाच...तसं पहायला गेलं तर सिनेमा मनोरंजक करण्यासाठी दिग्दर्शक थोडी 'सिनेमॅटिक सुट' घेतोच( याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'एम.एस.धोनी' हा सिनेमा )...काही प्रमाणात तसे करणे अपरिहार्य असते नाहीतर चित्रपट कंटाळवाणा वाटायला लागतो...संजय लीला भन्साळींनी ती तशी 'सिनेमॅटिक सुट' ऐतिहासिक चित्रपट बनवताना घेतली इथंच त्यांचं चुकलं...कारण आपल्याकडच्या लोकांना ऐतिहासिक नायक-नायिकांबद्दल नितांत आदर आहे (यातले निम्मे तर तसा आव आणतात)...म्हणून भन्साळींचं जरा चुकलंच हे मान्य करायला हवं...


आता प्रश्न उरतो की ज्या बाबीवरुन विरोध होतोय तसं काही चित्रपटात आहे का...? दिपिका पदुकोण साकारत असेलेलं 'पद्मावती'चं पात्र चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे असं विरोध करणार्‍यांचं म्हणणं आहे...मला एक कळत नाही की सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांव्यतिरिक्त अजून कुणीही चित्रपट पाहिलेला नसताना त्यांना हे कसे काय कळाले की 'पद्मावती' चा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आहे ते...

असो...भन्साळींनी चित्रपट बनवला तो त्यांच्या दृष्टिकोनातून...तसेही त्यांनी लोकांशी लाईव्ह संवाद साधताना स्पष्ट केले आहे की चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजी आणि पद्मावती यांचे संबंध इतिहासात जसे आहेत तसेच मांडण्यात आले आहेत...त्यात कसलीही मोडतोड केलेली नाही...तेंव्हा आता चित्रपट प्रदर्शित करण्याला कुणाची हरकत नसावी असे मला वाटते...ज्यांना चित्रपटाबद्दल आक्षेप आहेत त्यांनी चित्रपट पाहून मत ठरवावं...उगाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विरोध करायचा म्हणून करायचं हे काही बरोबर नाही...बरं ठीक आहे विरोध करा पण तो सनदशीर मार्गाने करा...नाहीतर अभिनेत्रीचे नाकच कापण्याची धमकी द्यायची, तिला जिवंत जाळण्यासाठी कोटींचे बक्षिसच काय जाहीर करायचं....अशा पद्धतीने हिंसक धमक्या देवून विरोध करायचा असेल तर हे काही आपल्या लोकशाही राष्ट्राला शोभनीय वर्तन नक्कीच नाही...

नेमकं घडतंय काय तर, स्वतःच्या मताच्या आड कुणी येत असेल तर असहिष्णुता वाढली असा ढोंग करायचा आणि दुसर्‍यांनी काही मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध करायचा...एकीकडे लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून मिरवायचं आणि दुसरीकडे दडपशाहीला खतपाणी घालायचं...असं कसं...

तिकडे 'इफ्फी' मधे 'न्युड' आणि 'एस दुर्गा' चित्रपटांबद्दल जे घडलं तेही चुकीचंच...ज्या चित्रपटाला 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'च्या 'ओपनिंग फिल्म' चा सन्मान मिळाला होता त्या चित्रपटाची माहीती व प्रसारण खात्याने महोत्सवातूनच हकालपट्टी केली यासारखी दुसरी दडपशाही आणखी काय असु शकते...


या सर्व घडामोडी बघता सामान्य माणूस म्हणून एक गोष्ट खटकतेच...याला लोकशाही म्हणावं की दडपशाही...